मराठा समाजाला आरक्षणाची प्रक्रिया सुरू : मुख्यमंत्री शिंदे

जालना पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 0000-00-00 00:00:00

मुंबई : फक्त दाखवण्यसाठी आम्ही काम नाही करत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सरकार आणि मी स्वस्थ बसणार नाही. जालन्यातील घटनेमुळे मलाही दु:ख झाले आहे. ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा दाबला तेच लोक आता गळा काढत आहेत. अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. बुलढाण्यातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते.

 

दरम्यान, जालन्यातील पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तसेच जे अतिरिक्त अधीक्षक आहेत, त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यात आले आहे. योग्य ती चौकशी करून या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. गरज पडली तर न्यायालयातदेखील जाण्याची आमची तयारी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयातील आरक्षण रद्द झाले. महाविकास आघाडीने एकदाही मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केला नाही. मराठा समाजाच्या मूक मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून संबोधले हे जनता कधी विसरणार नाही. त्यावेळी मराठा 

 

 

शैलेश बलकवडे जालन्याचे नवे पोलीस अधीक्षक

जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर आता सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. 

 

 

नाशिकमध्ये बंदला अत्यल्प प्रतिसाद

मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहराच्या मुख्य बाजारपेठांसह उपनगरातील काही व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली. परंतु, अनेक व्यावसायिकांच्या आस्थापना खुल्याच होत्या. सायंकाळनंतर बाजारपेठा खुल्या झाल्याने ग्राहकांची वर्दळही वाढली. दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपायुक्तांसह, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षकांचा फौजफाटा कर्मचाऱ्यांसह बंदोबस्तासाठी शहरात ठिकठिकाणी उतरविण्यात आला होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास सकल मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्रित जमून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन शहरातील  व्यावसायिकांना केले.  

 

  • आंदोलनाची धग तिसऱ्या दिवशीही कायम

 

जालन्यात सुमारे अडीचशे आंदोलकांवर गुन्हे

जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील लाठीचार्जच्या घटनेनंतर मराठा समाज प्रचंड आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी आंदोलने, रास्तारोको, बंद पुकारण्यात येऊन वाहनेदेखील पेटवून देण्यात आली. आंदोलकांनी हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. 
रविवारी (दि.३) तिसऱ्या दिवशीदेखील जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत आंदोलने सुरूच होती. भोकरदन येथे सकल मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्तारोको करत टायर पेटवून देण्यात आले. यावेळी स्वराज्य संघटनेचा जिल्हाध्यक्ष विकास जाधव याने स्वतःची दुचाकी पेट्रोल टाकत रस्त्याच्या मधोमध पेटवून दिली. 
दरम्यान, शहरातील अंबड चौफुली येथे रास्तारोको आंदोलनादरम्यान दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या २०० ते २५० आंदोलकांवर शनिवारी (दि.३) रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलनाचे आयोजन करणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, अशोक पडुळ, विश्वंभर तिरुखे, देवकर्ण वाघ, राधाकिसन शिंदे, संदीप लांडगे यांच्यासह २०० ते २५० आंदोलकांवर जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

जालना शहरातील अंबड चौफुली आणि इंदेवाडी भागामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या वादांचे रूपांतर दगडफेकीमध्ये झाले होते. यानंतर पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत. अंबड चौफुली भागात ट्रक जाळून चालक असलेला फिर्यादी आणि क्लिनरला डांबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणीदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अनेक ठिकाणी एसटी बसेस फोडण्यात येत असल्याने राज्य परिवहन महामंडळाकडून खबरदारी म्हणून मराठवाड्यात जाणाऱ्या शेकडो बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद, बीड, जालना, लातूरसह अहमदनगरकडे जाणाऱ्या अनेक बसेस सध्या डेपोतच उभ्या होत्या. तर पुण्यातून जाणाऱ्या ६०० पेक्षा अधिक बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.

 

जालन्यात १७ सप्टेंबरपर्यंत जमावबंदी

जालना : जिल्ह्यात सोमवारी सकाळी सहापासून १७ सप्टेंबरच्या रात्री बारापर्यंत जमावबंदीचे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी दिले आहेत. या आदेशामुळे सहा तारखेची श्रीकृष्ण जयंती, सात तारखेचा गोपाळकाला आणि १४ तारखेचा पोळा, तसेच १७ सप्टेंबरच्या मुक्ती संग्राम दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका आणि कार्यक्रम रद्द करावे लागणार आहेत.