बुमराह नंबर वन
जैस्वालचीही दुसऱ्या क्रमांकावर झेप
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-11-28 16:04:26

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर- गावसकर ट्रॉफीच्या पर्थ कसोटीत २९५ धावांनी दणदणीत विजयात कर्णधार जसप्रीत बुमराहचा मोठा वाटा होता. त्याने या सामन्यात आठ बळी घेतले. त्याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीत झाला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा कसोटी सामन्यांमधील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. बुमराहने आपल्या जुन्या क्रमवारीतून दोन स्थानांनी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला मागे टाकत बुमराह सिंहासनावर पोहोचला आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा अनुभवी खेळाडू जो रूट अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मात्र, यशस्वी जैस्वाल क्रमवारीत आव्हान देत आहे. यशस्वी जैस्वाल ताज्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात त्याने शानदार शतक झळकावले. जो पर्थ कसोटीतील टर्निंग पॉइंट ठरला. या ऐतिहासिक खेळीमुळे तो दोन स्थानांनी पुढे जात दुसऱ्या स्थानावर पोहोचला.