वैभव ठरला सर्वांत तरुण खेळाडू

आयपीएल लिलाव २०२५

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-11-28 16:07:02

मुंबई : आयपीएल-२०२५ मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी  बिहारचा फलंदाज तेरावर्षीय वैभव सूर्यवंशी आयपीएल लिलावात विकला जाणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला आहे. त्याला विकत घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स व दिल्ली कॅपिटल्समध्ये स्पर्धा लागली होती, ज्यात अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. राजस्थानने वैभव सूर्यवंशीसाठी १.१०  कोटी मोजून संघात सहभागी केले. 
           लिलावात विकल्या जाण्यापूर्वीच वैभवने इतिहास रचला होता, जेव्हा तो आयपीएल लिलावात सहभागी होणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला होता. दिल्ली कॅपिटल्सने या तरुण खेळाडूसाठी पहिली बोली लावली, ज्याची मूळ किंमत ३० लाख रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी एक कोटीपर्यंत बोली लावली, पण शेवटी राजस्थानने बाजी मारली. वैभवला आता माजी भारतीय प्रशिक्षक व महान क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवण्याची संधी मिळणार आहे. 
            वैभवने अलीकडेच चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या युवा कसोटी मालिकेदरम्यान शानदार फलंदाजी करत अवघ्या ६२ चेंडूंत १०४ धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तो स्पर्धात्मक क्रिकेटच्या १७० वर्षांच्या इतिहासातील सर्वांत तरुण शतकवीर ठरला होता. 
           तेरा वर्षांचा वैभव सूर्यवंशी हा उंच, धष्टपुष्ट खेळाडू आहे. त्याची शरीरयष्टी धिप्पाड असल्याने वयाबद्दल प्रश्न निर्माण होत राहतात. सन २०२३ मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत १४ वर्षांचा होणार असल्याचे सांगितले होते, तेव्हा लोकांच्या मनात त्याच्या वयाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.
          वयाचा हा संभ्रम दूर करताना वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी सांगितले की, बीसीसीआयने त्याच्या हाडांची चाचणी केली आहे. ओझा यांच्या मते बीसीसीआयला खेळाडूच्या जन्म दाखल्यावरील वयाशी कोणताही संबंध नसतो. कारण बीसीसीआयकडून खेळाडूच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात. त्यात त्याच्या हाडांची चाचणी करून त्याचे वय शोधते आणि त्याचे प्रमाणीकरण केले जाते. वैभव नऊ वर्षांचा असताना बीसीसीआयने त्याची हाडांची चाचणी केली होती. हाडांच्या तपासणीत त्याचे वय एक वर्ष अधिक म्हणजे १० वर्षे २ महिने किंवा चार महिन्यांच्या जवळपास होते. ओझा पुढे म्हणाले की, वैभवने २०२३ च्या मुलाखतीत जे वय सांगितले होते. ते हाडांच्या चाचणीच्या आधारे दिले असेल.

वडिलांनी विकली होती जमीन

वैभव हा मूळचा बिहार राज्यातील समस्तीपूर येथील मोतीपूर या छोट्या गावातील रहिवासी आहे. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वसाधारण आहे. त्यामुळेच  वैभवच्या क्रिकेटच्या प्रशिक्षणाच्या खर्चासाठी त्याच्या वडिलांनी गावाकडची जमीनही विकली होती. वैभवने वडिलांचा हा विश्वास खरा करुन दाखवला आहे.