नाशिकच्या रामकृष्ण घोषची चेन्नई सुपरकिंग्जमध्ये निवड

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-11-29 14:36:35

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : सौदी अरेबियातील जेधा येथे नुकत्याच झालेल्या आयपीएल-२०२५ लिलावात नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेट प्रशिक्षक शेखर घोष यांचे पुत्र रामकृष्ण घोष याची चेन्नई सुपरकिंग्ज या संघाच्या मालकांनी लिलाव प्रक्रियेतून निवड केली. याबद्दल शेखर घोष यांचे महात्मानगर क्रिकेट मैदानावर नावा असोसिएशनतर्फे पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.‌ 
              याप्रसंगी रामकृष्ण सध्या हैदराबाद येथे सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतील सामन्यात व्यस्त आहे. २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणाऱ्या महाराष्ट्र विरुद्ध बडोदा या चार दिवसीय रणजी सामन्यात रामकृष्ण घोष महाराष्ट्राकडून खेळेल. त्यावेळी त्याचा अष्टपैलू खेळ बघण्याची संधी नाशिककर क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे, असे शेखर घोष यांनी सांगितले. यावेळी नावाचे संस्थापक अध्यक्ष तथा‌ फेमचे माजी अध्यक्ष मोतीराम पिंगळे, अध्यक्ष प्रवीण चांडक, उपाध्यक्ष गणेश नाफडे, सहचिटणीस दीपक जगताप, माजी अध्यक्ष सचिन गिते व रवी पवार, कार्याध्यक्ष राजेश शेळके उपस्थित होते.