ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा 'टीम इंडिया'बरोबर सेल्फी
बुमराह, विराटचे विशेष कौतुक
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-11-29 15:21:33

कॅनबेरा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी, टीम इंडिया प्राइम मिनिस्टर इलेव्हनविरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. भारत आणि प्राइम मिनिस्टर इलेव्हन यांच्यातील सराव सामना ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारतीय संघाची भेट घेतली.ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी या भेटीचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कॅनबेरा येथील संसद भवनात ही भेट झाली. यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दोन्ही संघांबरोबर फोटो काढला व टीम इंडियाबरोबर सेल्फीही काढला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने कॅनबेरा येथील संसदेत भाषणही केले. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान संघाच्या प्रत्येक खेळाडूची भेट घेत त्यांच्याशी गप्पा मारल्या. दरम्यान, रोहित शर्माने आधी उपकर्णधार जसप्रीत बुमराहची ओळख करून दिली. बुमराहच्या कामगिरीचे खुद्द पंतप्रधानांनीही कौतुक करत त्याला स्टार म्हणाले. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी विराट कोहलीशी संवाद साधला. ते म्हणाले, “पर्थमधील तुझी कामगिरी खूप शानदार होती. तू अशावेळी एक चांगली खेळी केलीस, जेव्हा आम्ही आधीच बॅकफूटवर होतो. यावर विराट म्हणाला, 'थोडं अजून मसालेदार केलं.' यावर पंतप्रधान म्हणाले, “हो, तुम्ही भारतीय आहात.”