लग्नानंतर क्रिकेट सोडावे लागेल
मिताली राजला आला अनुभव
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-04 15:46:16

भारतीय विवाह संस्कृतीत आजही लग्न जुळवली जातात. रितसर मुली पाहण्याचा कार्यक्रम होतो आणि बैठकी होतात, देण्या-घेण्याच्या गोष्टी ठरतात आणि विवाह लावले जातात. या पारंपरिक पद्धतीत आजही काही ठिकाणी मुलाकडच्या नातेवाइकांची किंवा खुद्द नवरदेवाचीच संकुचित वृत्ती आणि विचार बघावयास मिळतात. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजलादेखील याचा अनुभव आला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिला आलेला हा अनुभव शेअर केला आहे.
मी रिलेशनशीपमध्ये होते, परंतु मला तेव्हा माझ्या खेळावर फोकस करायचे होते असे सांगून त्यानंतर अरेंज पद्धतीने लग्नाविषयी बोलताना मिताली म्हणाली की, ‘अरेंज मॅरेज’च्या कोणत्याही मीटिंगा झाल्या नाहीत. काही लोकांशी फोनवर बोलणे झाले होते. याच प्रक्रियेदरम्यान, मला एका व्यक्तीचा फोन आला, अगोदर लग्नासाठीचे नॉर्मल बोलणं झालं. मग त्याने मला विचारलं की, लग्नानंतर किती मुलांना जन्म देशील आणि लग्नानंतर मला क्रिकेट सोडावे लागेल. कारण, मुलांची आणि कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर असेल. मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले की, ज्याच्यासाठी माझ्या आई-वडिलांनी एवढा त्याग केला, मी एवढा त्याग केला, मी माझे क्रिकेट असंच कसे सोडून देऊ?
दरम्यान, मिताली सध्या सिंगल असून, याबाबत कोणताच निर्णय घेतला नसल्याचेही तिने सांगितले.