पुरुष अन् महिला क्रिकेटपटूंचा नवीन लूक
मुंबईत जर्शीचे अनावरण
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-04 15:56:38

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय पुरुष आणि महिला संघातील खेळाडूंसाठी नवीन लूक तयार केला आहे. दोन्ही संघांसाठी बीसीसीआयच्या वतीने नवीन जर्सी डिझाइन करण्यात आली आहे. त्याचे लाँचिंग नुकतेच करण्यात आले. मुंबईत आयोजित कार्यक्रमास बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर उपस्थित होते. जय शहा यांनी नवीन जर्सीचे अनावरण केले. ही जर्सी प्रसिद्ध जर्मन स्पोर्ट्स वेअर कंपनी आदिदासने बनवली आहे.
टीम इंडियाची पूर्वीची जर्सी पूर्णपणे निळ्या रंगाची होती आणि तिच्या खांद्यावर तीन आदिदासच्या लोगोचे पट्टे होते. विश्वचषकादरम्यान ते पट्टे तिरंग्याच्या रंगांचे केले आहेत. यावेळीदेखील खांद्यावर आदिदासचे प्रसिद्ध तीन पट्टे आहेत, ज्यांचा रंग पांढरा होता, पण यावेळी खांद्यावर तिरंग्याचा रंग आहे, ज्यावर हे पट्टे लावण्यात आले आहेत. या जर्सीचा निळा रंग आधीच्या जर्सीपेक्षा किंचित हलका आहे, पण त्याच्या बाजूने गडद रंग देण्यात आला आहे. केवळ महिला संघच नाही, तर पुरुष संघही या जर्शीत दिसणार आहे. महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारत महिला आणि ऑस्ट्रेलियन महिला संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका पाच डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे.या मालिकेत हीच जर्शी संघ वापरणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय पुरुष संघ इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे. भारतीय संघ नवीन जर्सी घालून या मालिकेत खेळेल. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत ही जर्सी घालून खेळताना दिसेल.