विराटसारखा दृढ निश्चय करा

पॉन्टिंगचा ऑस्ट्रेलियन संघाला सल्ला

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-04 16:01:23

ॲडलेड : पर्थ कसोटीत २९५ धावांनी दारुण पराभव झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या कसोटीत कामगिरी सुधरवण्यासाठी तयारीला लागला आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने संघाला मार्गदर्शन करत भारतीय जलद गोलंदाजांचा सामना कसा करायचा यासंदर्भात टिप्स दिल्या. तसेच विराट कोहलीच्या खेळातून काही तरी शिकत आपल्या फलंदाजीवर फोकस करा, असा महत्त्वपूर्ण सल्लादेखील त्याने दिला आहे. 
      पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मार्नस लॅबुशेन भारतीय वेगवान गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसला. या सामन्यात त्याने दोन आणि तीन धावा केल्यात. तसेच स्मिथला पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजविरुद्धही संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या या स्टार फलंदाजाला पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही, तर दुसऱ्या डावात त्याने ६० चेंडूंत १७ धावा केल्या. 
          या कामगिरीचा आढावा घेत पॉण्टिंग म्हणाला की, पर्थमध्ये मार्नस सर्वांत जास्त संघर्ष करताना दिसला. खेळपट्टी अवघड होती आणि भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला, पण आता पुढच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना नव्याने लढावे लागेल. त्यासाठी मी त्यांना विराटचे उदाहरण देईन. ज्याने पहिल्या डावात पाच धावा करून बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात १०० नाबाद धावा करून जबरदस्त पुनरागमन केले. विराटचा त्याच्या खेळावर विश्वास होता आणि तो पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात वेगळ्या खेळाडूसारखा दिसत होता. विरोधी संघाशी लढण्याऐवजी त्याने त्याच्या जमेच्या बाजूवर लक्ष केंद्रित केले. मार्नस आणि स्मिथ यांना तेच करण्याची गरज आहे. त्यामुळे विराटसारख्या दृढ निश्चयाची गरज या दोघांना आहे.