अबब ! २० षटकांत ३४९ धावांचा डोंगर
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : बडोदा संघाचा विक्रम
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-05 14:26:50

इंदूर :-सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघाने टी-२० सामन्यांमधील नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कृणाल पंड्या आणि हार्दिक पंड्याच्या या संघाने इंदूरमध्ये गुरुवारी सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात बडोदाने तब्बल ३४९ धावांचा डोंगर उभारला. फलंदाज भानू पानियाने ४२ चेंडूत झळकावलेल्या शतकामुळे बडोद्याने अवघ्या १७.२ षटकांत ३०० धावांचा टप्पा पार केला.
बडोदाचा संघ टी-२० डावात ३०० धावा करणारा पहिला भारतीय संघ ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बडोद्याने सुरुवातीपासूनच तुफानी फलंदाजी केली. सलामीवीर फलंदाज शाश्वत रावत आणि अभिमन्यू सिंग राजपूत यांनी पाच षटकांत ९२ धावांची भागीदारी केली. यानंतर अभिमन्यूने १७ चेंडूत ५३ धावा करून आपली विकेट गमावली.
टी-२० फॉरमॅटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर होता, ज्यांनी या वर्षी ऑक्टोबरमध्ये झांबियाविरुद्ध ३४४ धावा केल्या होत्या. पण आता बडोदाचा संघ टी-२० सर्वात मोठ्या धावसंख्येच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.
आयपीएल शिवाय टी-२० सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये १०० धावा करणारा बडोदा पहिला भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील संघ बनला. १० षटकांअखेर बडोद्याने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पनिया आणि सलामीवीर शिवालिक शर्मा यांच्या झंझावाती फलंदाजीमुळे १८० धावांची मोठी धावसंख्या उभारली.