बुमराहच्या भेदकतेने प्रतिस्पर्धी भयभीत
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-05 16:16:58

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिकेत जसप्रीत बुमराहची सर्वाधिक चर्चा होत आहे. कारण पर्थमध्ये बुमराहने कर्णधारपद भूषवत आठ विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेत टीम इंडियाचा विजय निश्चित केला. तेव्हापासून त्याला नियमित कर्णधार बनवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकवेळ अशी होती जेव्हा सर्वजण बुमराहला संपवायचे. मात्र, बुमराहने हार मानली नाही आणि जबरदस्त पुनरागमन केले. किंबहुना परत आल्यापासून तो अधिकच मारक बनला आहे. त्याला 'बुमराह २.०' असेही म्हटले जात आहे.
बुमराहने सन २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि सप्टेंबर २०२२ पर्यंत संघाचा नियमित घटक होता. याआधी त्याने आयपीएलमध्ये नाव कमावले होते. मात्र, त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासूनच त्याने जगाला तुफान दाखवले आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या गोलंदाजी शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या बुमराहने त्याच्या अचूक यॉर्करमुळे हळूहळू नाव कमावले. पॉवर-प्ले असो की डेथ ओव्हर, त्याच्यावर मात करणे फलंदाजांसाठी सोपे राहिलेले नाही. त्यानंतर सन २०२२ मध्ये एकवेळ अशी आली की, त्याला पाठीचा ताण व नंतर फ्रॅक्चरचा सामना करावा लागला. बुमराहला सप्टेंबर २०२२ मध्ये या समस्येचा सामना करावा लागला. सन २०२२ मध्ये भारत आशिया कप, टी-२० सोबत टी-२० विश्वचषकही खेळणार होता. आशिया चषकापूर्वी बुमराहने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.
आशिया कप टी-२० च्या उपांत्य फेरीत आणि नंतर टी-२० विश्वचषक २०२२ ला तो मुकला होता. हा असा काळ होता जेव्हा अनेक माजी क्रिकेटपटू, क्रिकेटपंडित आणि चाहत्यांनी बुमराहची कारकीर्द संपली आहे आणि तो पुनरागमन करू शकणार नाही. तो परतला तरी तो पूर्वीसारखा राहणार नाही, असे भाकीत केले होते. नेमका त्याचवेळी बुमराह शांत राहिला आणि त्याने फक्त त्याच्या पुनर्वसन प्रोग्रामवर लक्ष केंद्रित केले. बीसीसीआयनेही त्याला पूर्ण पाठिंबा दिला आणि शक्य ती सर्व मदत केली. बुमराह २०२३ मधील आयपीएलही खेळला नव्हता. ऑगस्ट २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतल्यावर दहा महिन्यांनंतर त्याचा निर्धार पूर्ण झाला. त्यानंतर बुमराहने मागे वळून पाहिले नाही. तो नुसता चांगला आणि मारक बनला नाही तर फलंदाजांसाठी अधिक चिंतेचा विषय होऊन आला आहे. बुमराहच्या पुनरागमनानंतर भारतीय गोलंदाजी अधिक धारदार झाली आहे. तो ऑगस्ट २०२३ मध्ये दुखापतीतून परतला आणि तेव्हापासून भारताने आशिया कप २०२३ आणि टी-२० विश्वचषक २०२४ सारख्या दोन मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत.सन २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. दुखापतीतून परतल्यानंतर बुमराहची गोलंदाजीची सरासरी त्याच्या दुखापतीपूर्वीच्या गोलंदाजीच्या सरासरीपेक्षा खूपच चांगली आहे. गोलंदाजीची सरासरी म्हणजे प्रतिविकेट किती धावा दिल्या. त्याचवेळी गोलंदाजीचा स्ट्राइक रेट म्हणजे प्रति विकेट किती चेंडू टाकले? तिन्ही फॉरमॅटमध्ये तो अधिक मारक ठरला आहे. हे त्याची आकडेवारीच सांगत आहे.
बुमराहच्या दुखापतीपूर्वीची म्हणजे जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०२२ आणि त्यानंतर दुखापतीतून परतल्यानंतर म्हणजेच ऑगस्ट २०२३ पासून आतापर्यंतची आकडेवारी सोबत देत खास आपल्याला माहिती येथे देत आहे. दुखापतीपूर्वी बुमराहची तिन्ही फॉरमॅटमध्ये गोलंदाजीची सरासरी २२.४८ होती. म्हणजेच तो प्रत्येक बळी २२.४८ धावा देऊन घेत होता. या काळात त्याचा स्ट्राइक रेट ३५.६ व इकॉनॉमी ३.७८ होता. म्हणजेच तो तिन्ही फॉरमॅटसह जवळपास प्रत्येक ३६ चेंडूंत एक विकेट घेत होता. त्याच वेळी दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर, तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याची गोलंदाजीची सरासरी १५.४७ अशी आहे. म्हणजेच प्रत्येक १५ धावांवर तो एक गडी बाद करत आहे. त्याचा स्ट्राइक रेट २६.३ व इकॉनॉमी ३.५२ असा आहे. म्हणजेच तो प्रत्येक २६ चेंडूंत एक विकेट घेत आहे. दुखापत होण्यापूर्वी बुमराहने तीस कसोटी सामने खेळले आणि १२८ बळी घेतले.
दुखापत होण्यापूर्वी त्याची कसोटीतील गोलंदाजीची सरासरी २१.९९ होती आणि इकॉनॉमी रेट २.६९ होता. त्याचवेळी दुखापतीतून परत आल्यापासून त्याची गोलंदाजीची सरासरी १५.३९ व इकॉनॉमी २.९९ आहे. या काळात त्याने अकरा कसोटी सामने खेळले असून, ५३ बळी घेतले आहेत. दुखापत होण्याआधी बुमराहची वन-डेमध्ये गोलंदाजीची सरासरी २४.३० होती, तर दुखापतीतून परतल्यानंतर त्याची गोलंदाजीची सरासरी २०.२८ अशी झाली. दुखापत होण्यापूर्वी बुमराहने ७२ वन-डेत १२१ बळी घेतले होते. त्याचबरोबर दुखापतीतून परतल्यानंतर त्याने १७ एकदिवसीय सामन्यांत २७ विकेट्स घेतल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर दुखापत होण्यापूर्वी बुमराहची गोलंदाजीची सरासरी २०.२२ व इकॉनॉमी ६.६२ होती, तर दुखापतीतून परतल्यानंतर त्याची गोलंदाजीची सरासरी केवळ ८.५७ व इकॉनॉमी ४.३२ होती. दुखापत होण्यापूर्वी बुमराहने साठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ७० विकेट्स घेतल्या होत्या, तर दुखापतीतून परतल्यानंतर त्याने दहा टी-२० सामन्यांमध्ये १९ विकेट्स घेतल्या आहेत. दुखापतीतून परतल्यानंतर त्याची गोलंदाजी अधिक धारदार झाल्याचे यावरून स्पष्टपणे दिसते. २०२३ मधील एकदिवसीय विश्वचषक आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर, बुमराहने स्वतः त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले होते. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने जलद गोलंदाजी खेळण्याचा मोठा अनुभव व सराव असलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जेरीस आणले आहे. त्याच्यातील नेतृत्वगुणांचा समस्त क्रिकेट जगताला परिचयही करून दिला आहे. त्यामुळे रोहित शर्मानंतर लाल चेंडूच्या कर्णधारपदाचा प्रश्नही काही वर्षांपुरता तरी मार्गी लागू शकतो.
-डॉ. दत्ता विघावे ( ९०९६३७२०८२ )