अखेर समोर आला ऐश-अभिचा सेल्फी
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-09 14:53:58

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक व ऐश्वर्या वेगवेगळे पोहोचले होते. अभिषेक त्याचे आई-वडील व बहिणीच्या कुटुंबाबरोबर आला होता. त्याच ठिकाणी ऐश्वर्या राय काही वेळाने लेक आराध्याबरोबर आली होती. त्यानंतर एका अवॉर्ड सोहळ्यात ऐश्वर्याबरोबर फक्त आराध्या दिसली होती. दोघांनी एकमेकांच्या वाढदिवसाला पोस्टदेखील केल्या नव्हत्या. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चेला चांगलीच हवा मिळत गेली. बच्चन परिवाराने मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीच पुष्टी दिलेली नाही. हे असं सगळं असताना अचानक ऐश्वर्या-अभिषेक यांचा एका लग्न सोहळ्यातील सेल्फी व्हायरल झाला. हे पेल्यातील वादळ होते की काय, या शंकेला वाव निर्माण झाला.
प्रसिद्ध निर्माते शशी रंजन यांची पत्नी अनु रंजनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांच्याबरोबर ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन दिसत आहे. ऐश्वर्याने घेतलेला एक सेल्फी अनुने शेअर केला आहे. यात ऐश्वर्या राय, तिची आई वृंदा राय, अभिषेक बच्चन व अनु, असे चार जण दिसत आहेत. सर्वजण हसून या फोटोत पोझ देताना दिसत आहेत. ‘खूप सारं प्रेम’ असं कॅप्शन देत अनुने हा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना असे म्हणत ऐश-अभि घटस्फोटाच्या बातम्यांकडे पाहत असल्याचे सध्या तरी दिसतेय. कारण ऐश्वर्या नुकतीच एका समारंभासाठी विदेशात गेली होती. तेथून भारतात परतल्यानंतर ती विमानतळावर अभिषेकने पाठविलेल्या गाडीत बसून घरी गेली होती. असे असले तरी या दोघांनी ‘ग्रे डिव्होर्स’ घेतल्याच्या बातम्या अधूनमधून समोर येत आहेत. आता खरं खोटं अभिषेक व ऐश्वर्याच जाणोत.