देशमुखांच्या भावाची उच्च न्यायालयात धाव
फरार वाल्मीक कराड महाकालच्या दर्शनाला
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-31 12:29:54

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सोमवारी (दि. ३०) उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणी या याचिकेतून केली आहे. या घटनेचा मास्टरमाइंड व ज्याच्यावर यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल आहे तो वाल्मीक कराड याच्या अटकेसंदर्भात योग्य ती पावले उचलावीत व कराडवर मोक्का लावावा. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून तत्काळ हटवून तपास निष्पक्ष व्हावा. त्यात राजकीय हस्तक्षेप असू नये, अशा मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी असलेला वाल्मीक कराड गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी आहे. अद्याप त्याचा कोणताही पत्ता तपास यंत्रणांना लागलेला नाही. मात्र, कराडचा मोबाईल १३ डिसेंबरपर्यंत सुरू होता. त्यानंतर मोबाईल बंद झाला. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशात दिसल्याचे यंत्रणांच्या तपासात समोर आले आहे. ११ डिसेंबर रोजी कराडने सहकाऱ्यांसह मध्य प्रदेशातील श्रीक्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे फोटो त्याच्याच फेसबुक अकाउंटवर पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे, यात कराडचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी दिसत आहेत. या फोटोंमुळे आता नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. कराड फरारी असल्याचे सांगितले जात आहे. मग त्याच्यासोबतचे पोलीस कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कराड शरण येण्याच्या तयारीत?
चहूबाजूने कोंडी झाल्यामुळे वाल्मीक कराड आता पोलिसांसमोर शरणागती पत्करणार असल्याचे सांगितले जाते. त्याला रविवारी रात्री पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती आली होती. मात्र, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला होता. कराड सोमवारी संध्याकाळपर्यंत किंवा मंगळवारी सकाळपर्यंत बीड पोलीस अथवा सीआयडी अधिकाऱ्यांसमोर शरण जाईल, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे आता कराड पोलिसांना कधी शरण जाणार आणि त्याच्या चौकशीत नेमकी कोणती माहिती समोर येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
कराडसमोर शरण येण्याशिवाय अन्य पर्याय नाही
बँक खाती गोठवल्याने कराडसमोर शरण येण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यासहित संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील अन्य तीन आरोपींची बँक खाती रविवारी गोठविण्यात आली. त्यामुळे कराड दूर जाऊ शकत नाही. पासपोर्टसंदर्भात कारवाई सुरू केली आहे. मात्र, त्याच्याकडे पासपोर्टच नसल्याने तो देशाबाहेर जाऊ शकत नाही, असे समजते. पुढील काही तासांत तो शरण येण्याची दाट शक्यता आहे.