अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण
व्हिडिओ पोस्ट करत फेटाळले आरोप
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-31 13:29:51

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सातत्याने अनेक आरोपांच्या फैरी ग्रामस्थ, राजकीय नेत्यांनी झाडल्यावर वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. मात्र स्वतःवरील सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी माझ्यावर आरोप केले जात असून जर पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचे कराड यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही मी पोलिसांना शरण जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यात जोडले जात असल्याचे कराड यांनी व्हिडिओत पुढे म्हटले आहे.
वाल्मिक कराड हे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे एकदम खास मानले जातात. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर विरोधकांकडून वाल्मिक कराड यांना लक्ष्य करण्यात आले. भ्रष्टाचारासह बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी काही प्रकरणे उपस्थित करून विरोधकांनी वाल्मिक कराड यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
दरम्यान, आज वाल्मिक कराड स्वतःहून पोलिसांना शरण येतील किंवा त्यांना नाट्यमय पद्धतीने अटक करण्यात येईल, याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर लिहले होते.