‘आका’ची संपत्ती जप्त झाली पाहीजे
कराडांच्या शरणागतीनंतर धस यांची मागणी
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-31 16:09:02

बीड:- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून चर्चेत असलेले वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले. यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले असून यापुढे आता ‘आका’ची संपत्ती जप्त झाली पाहीजे, त्याशिवाय या प्रकरणातील सत्य बाहेर येणार नाही. जर हा निर्णय घेतला नाही, तर आम्हाला वेगळा मार्ग अवलंबवा लागेल”, असे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
तसेच राजकीय द्वेषातून हे आरोप केले जात असल्याचा वाल्मिक कराड यांचा आरोपही खोटा असून आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खंडणीसाठी हे गुन्हे केले आहेत. यात राजकारणाचा काहीही संबंध नाही, असे धस यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, “सुदर्शन घुले, प्रतीक घुले या दोन आरोपींनी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण केली होती. त्यामुळे त्यांनाही लवकरात लवकर अटक करावी. तसेच या दोघांनी व्हिडीओ कॉल करून अटकेतील आरोपी विष्णू चाटे यांना मारहाण कशी होत आहे, हे दाखविले होते. तसेच आता शरण आलेल्या आकालाही व्हिडीओ कॉल केला असल्याचे समोर आले तर त्यांच्यावरही हत्येशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात यावा.
दरम्यान, कराड यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले असून याबाबतही धस यांनी कोणताही गुन्हेगार स्वतःचा गुन्हा कबूल करत नाही. पण पोलिसांनी कोठडीत घेतल्यानंतर त्यांना गुन्हा सिद्ध करावा लागतो. त्याप्रमाणे पोलिस तपासात सत्य बाहेर येईल, अशी आमची अपेक्षा असल्याचे सांगितले.