देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीवर राजकीय दबाव नाही
मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-31 17:15:23

मुंबई :- संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, हे मी पहिल्या दिवसांपासून सांगत आलो आहे. कुणालाही अशाप्रकारची हिंसा करण्याचा अधिकार नाही. सर्व दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत, तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील, जाणीवपूर्वक ही केस सीआयडीकडे देण्यात आली असून त्यांना हे प्रकरण पूर्णत: नि:पक्षपातीपणे हाताळण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. कुणाचाही दबाव त्यांच्यावर राहणार नाही , अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडे हे आज पुणे सीआयडी कार्यालयात शरण आले. वाल्मिक कराडे व धनंजय मुंडे यांच्यामुळेच बीड, परळीमध्ये अराजक माजले आहे, गुन्हेगारी वाढली असल्याचे आरोप जोर धरु लागले आहेत. आक्रोश, मूक मोर्चातही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पण तेच धनंजय मुंडे अजित पवार गटाच्या माध्यमातून महायुती सरकारमध्ये मंत्रीपदावर विराजमान आहेत. म्हणूनच या प्रकरणी सरकारवर देखील विरोधकांसह राज्यातील जनतेने निशाणा साधला आहे. मात्र कराड यांच्या शरणागतीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कुणालाही अशाप्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. त्या अनुषंगाने आम्ही तपासाला गती दिली असून त्यामुळेच वाल्मिक कराड यांना शरणागती पत्करावी लागली. आता हत्येतील फरार आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके कामाला लागली आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही. सर्वांना शोधून काढले जाईल, असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधून संतोष यांना न्याय मिळणार. जोपर्यंत आरोपी फासावर लटकत नाही, तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील, हा विश्वास त्यांना दिला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.