धस यांनी दिलगिरी व्यक्त केली, दादा खूप धन्यवाद !

प्राजक्ता माळीने टाकला प्रकरणावर पडदा

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-31 18:14:21

मुंबई :- भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी महिला कलाकारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कला व राजकीय विश्व ढवळून निघाले. प्राजक्ताला सर्वच स्तरातून भरपूर पाठिंबा मिळाला. प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांकरवी या प्रकरणी धस यांच्याकडून माफीची मागणी केली आणि अखेर सुरेश धस यांनी माफी मागितली नाही पण दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे मी देखील या विषयावरआता पडदा टाकत असल्याचे प्राजक्ता माळीने जाहीरपणे सांगितले आहे. याविषयीचा व्हिडिओ प्राजक्ताने सोशल मिडियावर शेअर केला आहे. 

 अत्यंत मोठ्या मनाने धस यांनी समस्त महिलावर्गाची माफी मागितली.  दिलगिरी व्यक्त केली, दादा खूप धन्यवाद. यामुळे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलंत. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळेजण जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे त्यांचे विचार सदैव इथे असतील हे तुम्ही या कृतीतून दाखवून दिलं आहे असे प्राजक्ताने या व्हिडिओत बोलताना सांगितले आहे. 

प्राजक्ताने पुढे बोलताना म्हटले आहे, की   पत्रकार परिषद घेतल्यापासून ते आतापर्यंत माझ्या कुटुंबीयांना अनेक मेसेज आले. महिलांच्या सन्मानासाठी सर्व स्तरांतून आवाज उठवला गेला. मला पाठिंबा दिला गेला, यामुळे आम्हाला बळ मिळालं…समाधान वाटलं. खूप खूप धन्यवाद!  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आयोग आणि त्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे  मी मनापासून आभार मानते.  मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यात जातीने लक्ष घातलं. अत्यंत निगुतीने आणि संवेदनशीलतेने त्यांना हा विषय पुढे नेला, मार्गी लावला.  आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही.  आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाकतेय.